वेस्टवर्ल्ड- आभासी वाटणारे जिवंत जग

प्रत्यक्षात वेस्टवर्ल्ड म्हणजे समांतर चालणाऱ्या स्टोरीलाईन्स, अत्यंत काटेकोर आणि बारीकसारीक गोष्टींवर लक्ष देऊन केलेले दिग्दर्शन, कडक अभिनय, देखणे, भव्य आणि सुंदर सेट्स आणि रमिन जवादीचं संगीत (तोच ज्याने गेम ऑफ थ्रोन्स ला सुद्धा संगीत दिलं आहे) अशा सर्वच बाबतीत एका उंचीवर नेऊन ठेवणारा शो आहे.

आजकाल सगळं जग रोबोटीक होत आहे. मशिन्स किंवा पार्ट्स बनवणारे रोबोट्स ते हुमनॉईड्स (अगदी माणसासारखे दिसणारे आणि बोलणारे), रोबोट्स हा प्रवास अगदीच रंजक आणि महत्वाकांक्षी आहे. हे इतके सगळे नवनवीन प्रयोग चालू असताना प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न घोंगावत असेलच, आपण बनवलेले हे रोबोट्स स्वतः विचार करून निर्णय घेण्याइतपत स्वावलंबी बनत आहत तर उद्या उठून त्यांनी आपल्यावर राज्य केलं तर? आपल्यालाच गुलामसारखे वागवू लागले तर? अशा आशयाचे बरेच सिनेमे येऊन गेले. त्याच धर्तीवर जोनाथन नोलन नावाच्या अवलियाने 'वेस्टवर्ल्ड' नावाची सिरीज एचबीओ वर आणली आहे.

बॅटमॅन ट्रायलॉजी वाला ख्रिस्तोफर नोलन माहीत असेलच तर त्याचा हा भाऊ जोनाथन, आणि ख्रिस्तोफर सारखाच वेगळ्या विचारांचा आणि वेगळ्या धाटणीचे प्रयोग करणारा 'कलाकार' आहे जोनाथन.

वेस्टवर्ल्ड मध्ये माणसाने एक संपूर्ण वेगळे अमेरिकन वेस्टच्या (वाईल्ड वाईल्ड वेस्ट, काऊ बॉय वैगेरे वैगेरे) धरतीवर जग बनवलं आहे ज्याला ते पार्क संबोधतात. अम्युुजमेंट पार्क असतात तसंच हे एक खूप मोठं अम्युुजमेंट पार्क आहे, ज्यात गावं आहेत खूप सारे लोक आहेत आणि तुम्ही जेवढं एक्सप्लोर कराल तेवढं सगळं दिलेलं आहे. आणि गंमत म्हणजे ह्या गावातले सगळे लोक हुमनॉईड्स आहेत. हे हुमनॉईड्स इथे 'होस्ट्स' म्हणून ओळखले जातात आणि हे होस्ट्स इतके सजीव आहेत की खरा खुरा माणूस आणि होस्ट मधला फरक सहज सहजी ओळखणे फारच कठीण आहे. आणि खऱ्या माणसांना इथे 'गेस्टस' म्हणून ओळखतात. तर गेस्टस आणि होस्ट्स यांच्यात फरक काय आणि या पार्क मध्ये करायचं काय? तर इथे यायचं, होस्ट्स च्या खूप साऱ्या स्टोरीज म्हणजेच कथानक आहेत त्याचा भाग व्हायचं किंवा मजा लुटायची. हे होस्ट्स त्यांना दिलेल्या स्टोरीज नुसार वागत राहतात, जसं की सामान्य गावकरी, दुकानधंदे वाले, बार वाले, बार मध्ये रुझवनाऱ्या आणि सेक्स पासून अगदी हवं ते करू शकाल अशा पोरी, गँगस्टर्स आणि गुंड इत्यादी सर्वजण रोज आपापल्या स्टोरी नुसार कामधंदे करत राहतात. हे गँगस्टर्स आणि गुंड दरोडे टाकतात होस्ट्स ना मारून टाकतात, पोरिंसोबत सेक्स करतात पळवून नेतात इत्यादी. पण ते 'गेस्टस'ना मारून नाही टाकू शकत. इथेच खरी गोम आहे, गेस्टस ह्या पार्क मध्ये काहीही करू शकतात अगदी काहीही, म्हणजे पोरींसोबत मजा मारू शकतात, गुंडांनाच नाही तर इतर होस्ट्स ना देखील मारून टाकू शकतात. तर अशा या जागतिक पार्क मध्ये उच्चभ्रू श्रीमंत लोक येतात आणि आपल्या आतील छुप्या इच्छा आकांक्षाचा कंड शमवितात भले ते तिथल्या होस्ट मुलींसोबत सेक्स करून किंवा होस्ट्स ना मारून टाकून!

वेस्टवर्ल्ड ची अशी काहीशी फ्युच्युरिस्टिक साय-फाय फँटसी स्टोरीलाईन आहे. पण ही झाली स्पॉयलर फ्री आणि थोडक्यात सांगण्यासारखी पटकथा. प्रत्यक्षात वेस्टवर्ल्ड म्हणजे समांतर चालणाऱ्या स्टोरीलाईन्स, अत्यंत काटेकोर आणि बारीकसारीक गोष्टींवर लक्ष देऊन केलेले दिग्दर्शन, कडक अभिनय, देखणे, भव्य आणि सुंदर सेट्स आणि रमिन जवादीचं संगीत (तोच ज्याने गेम ऑफ थ्रोन्स ला सुद्धा संगीत दिलं आहे) अशा सर्वच बाबतीत एका उंचीवर नेऊन ठेवणारा शो आहे. पुन्हा एकदा उल्लेख करावा लागेल तो जोनाथन नोलन चा, वेस्टवर्ल्ड एकदा बघायला सुरू केलं की माणसाने त्यामध्ये गुरफुटून जावं अशी उत्तम स्टोरीलाईन ची बांधणी केली आहे. वेगवेगळ्या स्टोरीलाईन्स चा आलेख सांभाळत आणि विचित्र धक्के सहन करत करत अजून वेस्टवर्ल्ड तुम्हाला पूर्ण सामावून घेतं.