रिमूव्ह चायनीज ऍप्स फ्रॉम फोन
माननीय पंतप्रधान मोदींनी 'आत्मनिर्भर व्हा' च्या दिलेल्या नाऱ्यापासून ह्या ट्रेंडने परत एकदा जोर पकडला. मुळातच चायना विरोधी भावना भारतीयांच्या मनात गेल्या काही वर्षांपासून आहेतच त्याचं कारण म्हणजे एकतर चायनाच्या सीमेवरील कुरापत्या आणि चायनाची पाकिस्तानला होणारी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत.
रिमूव्ह चायनीज ऍप्स फ्रॉम फोन' हा सध्याचा टोळधाडीपेक्षा वेगाने पसरणारा लेटेस्ट ट्रेंड! फक्त लॉकडाऊनच नाही तर लॉकडाऊन हे मूळ आहे ह्या ट्रेंडच्या मागे. सोनम वांगचुक म्हणजेच 3 इडिअट्स मधील फुंगसुक वांगडू हे पात्र ज्यांच्यावरून प्रेरित आहे ते व्हिजनरी सोनम वांगचुक ह्यांनी सुद्धा ह्या मुद्द्याला धरून व्हिडीओ प्रसारित केल्यामुळे ह्या 'ट्रेंडने आणखीनच जोर धरला आहे.
माननीय पंतप्रधान मोदींनी 'आत्मनिर्भर व्हा' च्या दिलेल्या नाऱ्यापासून ह्या ट्रेंडने परत एकदा जोर पकडला. मुळातच चायना विरोधी भावना भारतीयांच्या मनात गेल्या काही वर्षांपासून आहेतच त्याचं कारण म्हणजे एकतर चायनाच्या सीमेवरील कुरापत्या आणि चायनाची पाकिस्तानला होणारी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत. देशभक्तीच्या लाटेवर स्वर होऊन चायना वस्तू वापरणं बंद करा आणि चायनाच्या अर्थव्यवस्थेला सुरुंग लावा हे व्हाट्सएप युनिव्हर्सिटीमधून दिवाळी वेळी सुरू झालेले 'फॉरवर्ड' सत्र नवीन नाही. मग आधीच लॉकडाऊन, त्यात 1.5 जिबी इंटरनेट (जे रोज संपवावे लागते), देशभक्तीपर ज्वर, करोना चायना मधून आला त्याचा राग, 'लोकल पे वोकल' हा अजून एक नारा, इत्यादी अनादी कारणे पुरेशी होती ह्या आगीला आणखीन पसरवण्याला. ह्या सगळ्यामध्ये सुंदर डोकं लावलं ते दोन ऍप विकसित करणाऱ्या लोकांनी. एकाने बनवलं टिकटॉक ला भारतीय उत्तर 'मित्रो' ऍप आणि रिमूव्ह चायना ऍप्स'. उपरोध असा आहे की, मित्रो ऍप हे पाकिस्तानी अभियंत्यांकडून फक्त ₹२६०० मध्ये विकत घेऊन फक्त वर नवीन कव्हर चढवला आहे तर रिमूव्ह चायना ऍप च्या डेव्हलपरने फक्त एका लिस्ट सोबत तुलना म्हणजेच कंपेअर करून तो तुम्हाला ते ऍप्स डिलीट करायला सांगतो. मौके पे चौका लावत दोघे संधीचा फायदा घेत आहेत आणि यात गैर काहीच नाही. स्टार्टअप फंडिंग हा प्रकार माहीत असेल, तर पेटीएम, ओला, स्विग्गी, झोमॅटो, बिग बास्केट, ड्रीम 11 क्रिकेट, आणि असे बरेचसे ऍप्स मध्ये चायनीज कंपन्यांची लाखों-कोटींची गुंतवणूक आहे. ते ऍप्स काढून टाकणार का? वापरायचे बंद करणार का?
पण मूळ मुद्दा हा आहे कि हे ऍप्स काढून टाकणं किंवा गेलाबाजार 'सोनम वांगचुक' ह्यांच्या म्हणण्यानुसार, पहिला चायनीज सॉफ्टवेअर लगेच आत्ता ताबडतोब आणि मग एका वर्षात चायनीज हार्डवेअर आपल्या आयुष्यातून काढून टाका, ह्या गोष्टींनी चायना आणि चायनीज इकॉनॉमीला कितपत फरक पडणार आहे? मुळात 'रिमूव्ह चायना ऍप' तुम्ही एकतर चायनीज फोन वरून पाठवत आहेत किंवा त्यातील अर्ध्याहून जास्त पार्ट चायनामध्ये बनलेल्या फोन मधून. तुम्ही म्हणाल कि आम्ही सॅमसंग किंवा आयफोन वापरतो, तर हे दोनच काय जगातील कोणत्याही भागात बनणाऱ्या फोनचे अर्ध्याहून जास्त पार्ट चायनामध्येच बनतात. मी 'मेक इन इंडिया' फोन वापरतो असं जे थाटात बोलायला येतील त्यांच्यासाठी एक महत्वाचा खुलासा, 'मेक इन इंडिया' हा फोन च्या बाबतीत तर एक मोठा फार्स आहे. ह्याचा जास्तीत जास्त फायदा चायनीज कंपन्यांनीच घेतला आहे. नावाला ते फोन बनवतात 'मेक इन इंडिया' पण मूळ कंपनी तर चाइनीजच आहे. तर हा झाला मुद्दा चायनीज फोन्स वरून चीन बद्दल आवई देण्याचा. हे सोडून बाकी जवळपास प्रत्येक उद्योगधंद्यात चायनाशिवाय पान हालत नाही. पण 'व्हाट्सएप युनिव्हर्सिटी पब्लिक'ला ह्यापलिकडे काही दिसत नाही कि कळत नाही.
पुढचा मुद्दा हार्डवेअर काढून टाकण्याचा. तर वर लिहिल्याप्रमाणे जास्तीत जास्त चायनीज कंपन्यांनी 'मेक इन इंडिया' सुरु केलेलं आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेला थोड्या प्रमाणात मदत करून मलई सगळी चायनाला नेण्याचा घाट उघड उघड सुरु आहेच. बर हार्डवेअर म्हणजे बाकी गोष्टी म्हणजेच जिकडे फिजिकल कच्चा माल लागतो असे उद्योगधंदे पण समाविष्ट केले असतील असं समजून त्याबद्दल बोलू. कच्चा माल लागणाऱ्या जवळपास सर्वच उद्योगामध्ये देखील चायनाचा शिरकाव फार मोठ्या प्रमाणात आहे. 'केमीकल', 'इलेक्ट्रिक', 'हेवी मेटल' इतकेच काय तर फार्मा इंडस्ट्री तर जवळपास ८० ते ९० % चायनावर अवलंबून आहे. चायना मधून येणारा कच्चा माल एकतर आयात करून देखील आपल्या इथे तयार होणाऱ्या मालापेक्षा स्वस्त मिळतो ते देखील आपल्यापेक्षा चांगल्या प्रतीचा. (चायना मध्ये फक्त बोगस आणि कमी प्रतीचा माल मिळतो हा एक अजून मोठा भ्रम आहे. चायनाची 'मेगाफॅक्टरी' तुम्हाला जशी तुमची गरज त्यानुसार त्या लायकीचा माल देतात तोही बाकींच्याच्या तुलनेत स्वस्त किमतीमध्ये).
काही लोक म्हणतील कि, सगळं ठीक आहे पण जर आपण हे सुरु केलं तर काहीतरी फायदा होईल ना? हो नक्कीच होईल. जसं कि टिकटॉकचा पुढच्या तिमाही मध्ये १०० कोटीचा फायदा भारताकडून कमावण्याचा मानस आहे. तर बाकीच्या अशा एप्सचा वापर न करण्याने नक्कीच काही शे-कोटींचा फटका नक्कीच बसेल. पण चीनच्या भल्या मोठ्या निर्यात महासागरात खडा मारण्याचा प्रयत्न आहे. आपल्याला ह्या सगळ्याच बाबत आत्मनिर्भर होण्यासाठी बराच काळ लागेल, त्यासाठी पूरक धोरणे लागतील जेणेकरून उद्योग धंदे 'लोकल पे वोकल' ओरडून सांगू शकतील. त्यामुळे आत्त्ता हे ऍप काढणे, चायनीज वस्तू वापर बंद करणे हा 'व्हाट्सएप युनिव्हर्सिटी ट्रेंड' चालू राहू दे त्याने काहीही फरक पडत नाही.