परप्रांतीय स्थलांतर : राज्यातील भूमीपुत्रांसाठी संधी
परप्रांतीय मजुरांच्या जाण्यानं ज्या रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या संधी निर्माण झाल्या आहेत, त्या मिळवण्यासाठी फक्त कुशलताच नाही तर मानसिकताही बदलण्याची गरज आहे.
परप्रांतीय मजुरांची स्थलांतर करताना झालेली हेळसांड आपण पाहिली. उपाशी पोटी आपल्या लेकरांना घेऊन हजारो मैल पायपीट करत असताना या मजुरांच्या मनात लाखो विचारांचा प्रवासही सुरु असेल. अर्ध्यावर सोडलेल्या संसाराचं काय होणार? नोकरीचं काय होणार? भुकेलं लेकरू घरी पोहचेपर्यंत तग धरेल ना? हे आणि असे बरेच प्रश्न मनात घेऊन परतीची वाट धरलेल्या मजुरांनी अखेर महाराष्ट्राला तूर्तास तरी रामराम ठोकला.
यांच्या एवढ्या मोठ्या संख्येने जाण्याने महाराष्ट्रातील स्थानीक लोकांना रोजगार उपलब्ध होईल यात शंका नाही. पण खरा प्रश्न हा आहे कि हे परप्रांतीय लोक जे व्यवसाय आणि नोकऱ्या सोडून गेलेत त्यातील किती जागा आपले स्थानिक लोक भरून काढतील? माझ्या मुलाचा पाणीपुरीच्या व्यवसाय आहे हे सांगताना किती मराठी पालक अभिमानाने मान वर करून सांगतील? प्रश्न पालकांचीच नाही तर पिढ्यानपिढ्या सुरु असलेल्या मानसिकतेचा आहे. मुलंही करिअर निवडताना हा विचार करतात. समाज आपल्याला काय म्हणेल, आपल्या व्यवसायाला/नोकरीला कुणी नावं तर ठेवणार नाही ना, अहो एवढंच काय आपल्याला लग्न करताना मुलगी देतील ना एवढ्यापर्यंत विचारांची मजल जाते आणि मग तो बिचारा थोडा पगार कमी मिळाला तरी चालेल पण काम चांगल हवं हा विचार करून करिअर निवडतो.
काही उद्योग असे आहेत कि ते वर्षानुवर्षे या परप्रांतीय मजुरांच्या कुशलतेवर उभे आहेत. कित्येक वर्षे घाम गाळून त्यांनी बरेच कारखाने आपल्या राज्यात उभे केले आहेत. वर्षानुवर्षे कारखान्यांमध्ये काम करत असलेले कुशल कारागीर परत भरून काढणे उद्योजकांसाठी एवढं सोपं आहे का? आधीच करोना मुळे व्यवसायाची घडी विस्कटलेली असताना, नवीन मजुरांसह व्यवसाय सुरु करणे खूप मोठं आव्हान असणार आहे. या उद्योजकांना हि उणीव भरून काढण्यास सरकारने मदत केली तर नक्कीच स्थानिक लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी काही मार्ग निघू शकतील.
एकूणच काय, परप्रांतीय मजुरांच्या जाण्यानं ज्या रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या संधी निर्माण झाल्या आहेत, त्या मिळवण्यासाठी फक्त कुशलताच नाही तर मानसिकताही बदलण्याची गरज आहे. मराठी माणूस कोणत्याही कामात मागे नाही, कोणत्याही क्षेत्रात कमी नाही. त्याला आता संधी चालून आली आहे; मराठी माणूस नक्कीच ही उणीव भरून काढेल पण त्यासाठी थोडा वेळ लागेल कारण प्रश्न फक्त निर्माण झालेल्या मोकळ्या जागा भरून काढण्याचा नाही तर मानसिकता बदलण्याचा आहे जी बदलायला वेळ लागेल. तोपर्यंत काय?